Sunday, August 15, 2010

स्वतंत्र भारतात,अंध पारतंत्र्यात!

आज आपण ६४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. आपण स्वातंत्र्य सर्वार्थाने उपभोगत असतांना भारतातील सव्वा कोटी दृष्टिहीन देशबांधव मात्र पारतंत्र्यसदृश अशा भयाण,काळ्याकुट्ट अंधकारात खितपत पडले आहेत,कसे तरी दिवस ढकलत आहेत.
त्यातील सुमारे ३० लाखांना नेत्ररोपणासारख्या साध्या,सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळून त्यांना नवजीवनच प्राप्त होऊ शकते,त्यांच्या जीवनात प्रकाशाची रम्य पहाट येऊ शकते, त्यांच्या बेरंग आयुष्यात तिरंग्याचे अर्थपूर्ण रंग जाणवणारी दृष्टी जरूर येऊ शकते.
यासाठी दर वर्षी नितांत आवश्यकता आहे ती सुमारे लाख-दीड लाख नेत्रदानांची.अत्यंत खेदजनक वस्तुस्थिती मात्र अशी आहे की आज फक्त सुमारे १५ हजारच नेत्रदाने होत आहेत आणि निधन पावणारे आहेत मात्र तब्बल सुमारे ८० ते ८५ लाख!
हे अत्यंत व्यस्त प्रमाण एकीकडे असतांना श्री लंकेसारखा अत्यंत छोटा देश मात्र त्यांच्या देशात त्यांच्या नागरिकांनी उदात्त अशा जाणीवेतून दान केलेले सुमारे १० हजार नेत्र आपल्याला पुरवीत आहे.
याची काही लाज,लज्जा,शरम आपल्याला वाटणार आहे की नाही?
या खंडप्राय देशातील अनास्थेची ही अखंड अशी निर्लज्ज परंपरा नष्ट होणार आहे की नाही?देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण झालेला असतांना, होत असतांना या साध्या क्षेत्रातही तो स्वयंपूर्ण व्हावा यासाठी गांभीर्याने अन स्वतंत्रपणे आपण काही विचारच नव्हे तर कृतीही करणार आहोत की नाही?असे विविध प्रश्न पडतात खरे.
जाणीवपूर्वक कृतीने उत्तर देणे आपल्याच हाती आहे.

No comments:

Post a Comment